नळपाणी पाईपलाईनचे काम की नागरिकांचा छळ ?

ठेकेदाराला आशीर्वाद कोणाचे ? : माजी नगरसेवक सुरेश भोगटे
Edited by: विनायक गांवस
Published on: March 24, 2026 14:45 PM
views 63  views

सावंतवाडी : माठेवाडा ते वैश्यवाडा परिसरात सध्या सुरू असलेले पाईपलाईनचे काम म्हणजे नियोजनाचा अभाव आणि मनस्तापाचा कळस असल्याची टीका माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली आहे. या कामामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडल्यामुळे लोकांचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 ठेकेदाराकडून वापरण्यात येत असलेली अर्धा इंची पाईपलाईन ही 'ब्रँडेड' नसून अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. भविष्यात यामुळे मोठ्या प्रमाणावर गळती होऊन पुन्हा रस्ते खोदावे लागतील, अशी भीती श्री. भोगटे यांनी व्यक्त केली आहे. जेसीबीने रस्ते उकरताना जुन्या पाणीपुरवठा वाहिन्या तोडल्या जात आहेत. यामुळे अनेक दिवस नागरिकांना पाण्याविना राहावे लागत आहे. कामाच्या ठिकाणी नगरपालिकेचा एकही जबाबदार कर्मचारी उपस्थित नसतो. ठेकेदाराची माणसं स्थानिक नागरिकांना जुमानत नाहीत. खोदलेली माती आणि दगड रस्त्यावरच अस्ताव्यस्त टाकल्याने लोकांच्या घरात आणि वाहनांवर धुळीचे थर साचले आहेत. हे काम अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सुरू आहे. जेसीबीने चर खोदून त्यात निकृष्ट पाईप टाकून वरून दगड-माती ढकलली जात आहे. हे तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला कोणाचे आशीर्वाद आहेत ? अधिकाऱ्यांना कळवूनही ठेकेदार ऐकत नसेल, तर याचे गौडबंगाल काय? असा सवाल श्री. भोगटे यांनी केला.

तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी ठेकेदाराला लेखी नोटीस देण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु, प्रत्यक्ष कामात कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे सांगितले. नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या कामाची पाहणी करावी, निकृष्ट पाईप बदलून घ्यावेत आणि रस्ते पूर्ववत करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.