सावंतवाडी शहरात वादळी वाऱ्याचे थैमान

सुदैवाने टळला अनर्थ
Edited by: विनायक गावस
Published on: April 24, 2026 08:16 AM
views 229  views

सावंतवाडी : शहरात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले आहे. काल‌ रात्री १२ च्या सुमारास वीजांच्या गडगडाटासह वाऱ्यांमुळे झाड पडण्यासह पत्र्याची शेड उडून गेल्याचे प्रकार सावंतवाडीत घडले. सुदैवाने यात कोणाला गंभीर इजा पोहचली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

गुरूवारी सायंकाळपासून तालुक्यात वीजांचा लखलखाट सुरू होता. आंबोलीत पाऊस देखील पडला. यातच रात्री १२ च्या सुमारास शहरात वादळी वाऱ्याने थैमान घातले. या वाऱ्यात मोती तलाव, शिव उद्यान परिसरातील झाड पडण्यासह रामेश्वर प्लाझा येथील पत्र्याचे छत उडून गेले.  एसपी कॉलेजच्या परिसरात हे छत उडून पडले. सुदैवाने यात कोणाला गंभीर इजा पोहचली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रात्री जवळपास २ तास विद्युत पुरवठा देखील खंडीत होता. शहरात आणखीनही काही ठिकाणी या वाऱ्याने नुकसान केल्याचे समजते. नुकतीच न.प. कडून पत्र्याच्या शेडबाबत ऑडीटची सुचना देण्यात आलेली असताना रामेश्वर प्लाझा येथील छत उडून गेल्याने मोठा अपघात घडला. सुदैवाने हे छत मोती तलावा समोरील भागात न कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.