श्री देव धावगिरा देवस्थानच्या होळी उत्सवात पर्यावरण रक्षणाचा संदेश

Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2026 15:24 PM
views 13  views

सावंतवाडी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कलंबिस्त गणशेळवाडी येथील श्री देव धावगिरा देवस्थानच्या होळी उत्सवात यंदा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर 'निसर्ग आणि पर्यावरण बचाव' हा सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून, भाविकांनी दरवर्षी किमान दोन आंब्याची झाडे लावण्याचा संकल्प केला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे जिल्ह्याच्या आध्यात्मिक परंपरेला आता पर्यावरण रक्षणाची जोड मिळाली आहे.

आंबा वृक्ष जतनासाठी घातले साकडे

कोकणात सध्या स्थानिक आंब्याची आणि फणसाची झाडे दुर्मिळ होत चालली आहेत. होळीसाठी आंब्याच्या झाडाचे पूजन करण्याची परंपरा असली, तरी ही झाडे भविष्यात नामशेष होऊ नयेत यासाठी शिवसाम्राज्य मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाविकांना आवाहन केले. भाविकांनी उन्हाळ्यात आंबे खाल्ल्यानंतर त्यांच्या कोय जतन कराव्यात आणि त्यातून रोप तयार करून दरवर्षी दोन झाडे लावावीत, असा संकल्प यावेळी करण्यात आला.