
कुडाळ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यासाठी कणकवली येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा सज्ज झाली आहे. येत्या शुक्रवार, ६ मार्च २०२६ रोजी कणकवली शिवसेना शाखेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
शिवजयंतीनिमित्त सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात येणार आहे. उत्सवाचे औचित्य साधून सकाळी ९:०० वाजता शिवसेना शाखेत श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीच्या वतीने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मंगलप्रसंगी कणकवली तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवासैनिक, परिसरातील नागरिक आणि शिवप्रेमीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन करावे, असे आवाहन शिवसेना तालुका कार्यकारिणीने केले आहे.










