
कणकवली : यश मिळाले, पद मिळाले तरी उत्कर्षासाठी जर प्रयत्न केले, कष्ट उपसले तर गगनालाही गवसणी घालता येते हे कणकवली तालुक्यातील नडगिवे गांवचे तलाठी श्री. विकास चाळके यांनी दाखवून दिले आहे. परीश्रम करणाऱ्याचे भविष्य नेहमीच उज्ज्वल असते. असे गौरवोद्गार "आम्ही कणकवलीकर" अशोक करंबेळकर यानी विकास चाळके यानी पोलिस उपनिरीक्षक पदाच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांचा कणकवली तहसीलदार कार्यालयात करण्यात आलेल्या महसूल कौटुंबिक सन्मान सोहळ्यात काढले. काल, २५ मार्च रोजी हा परीक्षा निकाल जाहीर झाला.
ऑगस्ट २०२४ मध्ये विकास चाळके कणकवली तालुक्यात नडगिवे गांवचे तलाठी म्हणून रूजू झाले. आपले नियत कर्तव्य पार पाडत नागरिकांना सेवा देत असताना त्यांचा एम्.पी.एस्.सी.चा पोलिस उपनिरीक्षक पदाच्या अभ्यास सुरू होता. त्यांचे मूळ गांव कोदळ, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आणि शिक्षण शिक्षण; मेकॅनिकल इंजिनीअरींग डिप्लोमा व बी.ए.(राजकारण शास्त्र व इतिहास) असे झाले असून एका सर्वसामान्य परिवारातील सदस्य आहेत.
तहसीलदार श्री.दीक्षांत देशपांडे म्हणाले, चाळके कामात चोख असत, त्यांच्याबद्दल कधीही तक्रारी झाल्या नाहीत. वेळोवेळी ते आपल्या समस्या, अडचणी मांडत असत आणि त्यांचा वरीष्ठ म्हणून मी त्याना मार्गदर्शन करत असे. माझ्या कार्यालयातील आणखीही काही कर्मचारी स्पर्धा परीक्षाना बसले असून तेही असेच यश मिळवतील असा मला विश्वास आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ढोर मेहनतीपेक्षा नेमकेपणा, समयसूचकता व तारतम्य आवश्यक असते आणि मग यश तुमच्यापासून दूर पळत नाही.
सन्मान स्विकारल्यानंतर आपले मनोगत मांडताना श्री. विकास चाळके म्हणाले, परिस्थिती मुळे तलाठी नोकरीत रूजू झालो असलो तरी शिक्षण घेतानाच मी पोलिस उपनिरीक्षक हे माझे ध्येय निश्चित केले होते. व तसे प्रयत्न सातत्याने करीत राहीलो म्हणून आज यश मिळाले. तलाठी नोकरी करताना परीक्षा कालावधीत तहसीलदार देशपांडे साहेब व माझे सहकारी यानी रजा सुट्ट्या न कुरकुरता दिल्या व माझे दफ्तरही सांभाळले यासाठी मी सर्वांचा कृतज्ञ आहे. त्यांच्या या मदतीचा मोठा सहभाग माझ्या यशात आहे. भविष्यात माझी सेवा सर्वसामान्य नागरिकाना समाधान देणारी व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारी असेल.
या छोटेखानी कौटुंबिक कौतुक सोहळ्यात कणकवली तहसीलदार कार्यालयातील सर्व कर्मचारी व नागरिक सामिल झाले होते.