माय लेकी एकाच वेळी उत्तीर्ण

कळसुली येथील रिद्धी वारंग व आई वैभवी वारंग यांचे यश
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 02, 2026 21:08 PM
views 14  views

कणकवली : आई आणि मुलगी एकाच वेळी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. कळसुली येथील कु. रिद्धी हेमंत वारंग व तीची आई सौ. वैभवी हेमंत वारंग यांनी हा  बहुमान मिळवित एक आदर्श निर्माण केला आहे. वैभवी हेमंत वारंग या कुडाळ तालुक्यातील पोखरण येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असून वयाच्या ४८ व्या वर्षी कळसुली ज्यु. कॉलेजमधून त्यांनी बारावी परीक्षा दिली होती. त्या १९९२मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्या होत्या. तब्बल ३३ वर्षानंतर त्या कळसुली जुनियर कॉलेज येथून बारावी परीक्षेला प्रविष्ट झाल्या. आणि विशेष म्हणजे यावेळी बारावीची परीक्षा त्या पहिल्याच प्रयत्नात कला शाखेतून ४१.६७ (२५० गुण )टक्के  मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. तर त्यांची मुलगी कु. रिद्धी ही न्यू इंग्लिश स्कूल कसाल येथून विज्ञान शाखेतून ४७.१७ टक्के (२८३ गुण) मिळवत उत्तीर्ण झाली आहे.

कुडाळ तालुक्यातील पोखरण येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. वैभवी वारंग या संसाराचा गाढा चालवत असताना त्यांनी हे यश संपादन केले आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी आई व तिच्या सोबत मुलीने एकाचवेळी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.