निविदा रद्दतेवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

कणकवली नगरपंचायतीची विशेष सभा
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 13, 2026 20:18 PM
views 40  views

अधिकारावरून पारकर यांनी हर्णे यांना सुनावले खडेबोल

कणकवली : नगरपंचायतीच्या प्रशासकीय राजवटीत झालेल्या २१ कामांची निविदा रद्द करण्यासाठी सोमवारी आयोजित केलेल्या न. पं. ची विशेष सभेत निविदा रद्द करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अखेर निविदा रद्द करण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांनी बहुमतांनी घेतला.  

कणकवली नगरपंचायती विषेश सभा नगरपंचायतीच्या प. पू. भालचंद्र महाराज यांच्या सभागृहात नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी गौरी पाटील, नगरसेवक रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, सत्यजित उर्फ बाळू पारकर, संकेत नाईक, लुकेश कांबळे, नगरसेविकास सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, मनस्वी ठाणेकर, नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे, संजय कामतेकर, राकेश राणे, सुमित राणे, न. पं. चे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम यांच्यासह न. पं.चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत अमोल अघम यांनी प्रशासकीय राजवटीतील २१ कामांच्या निविदा रद्द करण्याचा ठरावाचा विषय सभागृहासमोर ठेवला. याला गणेश उर्फ बंडू हर्णे यांनी आक्षेप घेत हा न. पं.च्या नियमानुसार हा ठराव सभागृहासमोर ठेवता येणार नाही, असे सांगितले. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावर संदेश पारकर यांनी मध्यस्थी करीत मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी प्रशासकीय राजवटी झालेल्या निविदा रद्द करण्याचा ठराव घेतल्याचा व्हिडिओ सभागृहाला दाखवला. निविदा रद्दतेच्या ठरावावरून पारकर व हर्णे यांच्यात वादंग झाला, माझे अधिकार मला तुम्ही सांगण्याची गरज नाही, असे खडेबोल पारकर यांनी हर्णे यांना सुनावले.  त्यानंतर निविदा रद्द करण्यासाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये १० विरुद्ध ९ असे मतदान झाले. सत्ताधारी गटाच्या बाजूने बहुमत असल्याने सदर निविदा रद्दकरून फेरनिविदा ७ दिवसांच्या आता काढण्याचा ठराव घेण्यात आला. 

विशेष सभेत न. पं. नियमानुसार निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा ठराव घेता येत नाही, असा आक्षेप  घेत हर्णे, नलावडे, मेघा गांगण यांनी इतिवृत्तात तशा प्रकारची नोंद घालण्यात यावी, अशी त्यांनी न. पं. प्रशासनाला केली.

बैठकीत शहरातील पाणी टंचाई, एका एजन्सीकडून शहराचा माहिती डाटा तयार करणे, मान्सूनपूर्व कामे सुरू करण्यावर चर्चा झाली. नगरपंचायतीच्या राजकीय व प्रशासकीय राजवटीत एका लाडक्या ठेकेदाराला तब्बल १४५ कामे देण्यात आली, असा आरोप बाळू पारकर यांनी केला. 

लाडक्या ठेकेदाराला देण्यात आलेली बहुतांशी कामे निकृष्ट दर्जा तर काही अपूर्णावस्थेत आहेत ही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. न. पं. प्रशासनाने सदर कामांची पाहणी करून त्याचा अहवाल सीईओंना सादर केल्याचे त्यांनी सांगितले. कलमठ गावाने वेगळी पाणीपुरवठा व्यवस्था उभी करावी

कणकवली शहरातील सांडपाणी गडनदीपात्रात गेल्यामुळे पाणी दूषित झाले आहे. परिणामी कलमठची नळपाणी योजना बंद पडली आहे. कलमठवासीयांना माणुसकीच्या भावनेतून कणकवली नगरपंचायत स्वत:च आर्थिक झळ सोसून नळपाणी योजनेद्वारे दर दिवशी ३ लाख लिटर पाणी कलमठ गावाला दिले जात आहे. त्यामुळे आगामी काळात कलमठ वेगळी पाणीपुरवठा व्यवस्था उभी करावी, असे आवाहन संदेश पारकर यांनी केले. 

कणकवली नगरपंचायतीच्या नळपाणी योजनेद्वारे कलमठ गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्या न. पं.ला आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे कलमठ ग्रा.पं.ने न. पं.ला पाणीपुरवठ्यासाठी येणाºया खर्चाची रक्कम अदा करावी, असे आवाहन गौरी पाटील यांनी केले.