माणूस म्हणून जगा आणि समाजाच्या विकासासाठी काम करा : पंढरी चव्हाण

कुडाळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 15, 2026 15:33 PM
views 78  views

कुडाळ : "भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करताना प्रत्येकाने माणूस म्हणून जगा आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करा," असे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र (मुंबई) चे राज्याध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी केले.

कुडाळ तालुक्यातील पावशी येथे जिल्हाध्यक्ष बाबल पावसकर यांच्या निवासस्थानी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

लोकशाही हा केवळ यंत्रणेचा भाग नसून जीवन मार्ग - पंढरी चव्हाण

उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करताना पंढरी चव्हाण पुढे म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिताना सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच आज आपला समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित असलेल्या समूहाला मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. लोकशाहीचे सामाजिककरण झाले पाहिजे आणि तो एक 'जीवन मार्ग' आहे, हा त्यांचा विचार आजही तितकाच प्रस्तुत आहे."

या कार्यक्रमाला जिल्हयातील अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये: बाबल पावसकर (जिल्हाध्यक्ष)प्राजक्त चव्हाण (राज्य उपाध्यक्ष) संतोष जाधव (जिल्हा सरचिटणीस) अरुण होडावडेकर, रघुनाथ चव्हाण, मनीष पावसकर, मंगेश चव्हाण, गुरू मूळदेकर, सहदेव चव्हाण. भारत पेंडुरकर, राजू तांबे (नांदगाव तंटा मुक्ती अध्यक्ष), सुरेश हरकुळकर, कांता चव्हाण (वेंगुर्ला तालुका अध्यक्ष), ॲड. भूषण कदम, आत्माराम पावसकर, विल्सन डिसोजा.

जिल्हाध्यक्ष बाबल पावसकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज आमची ओळख आहे." तर जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव यांनी वाडीवाडीत जयंती साजरी करून समाज प्रबोधनाचे विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत पेंडुरकर यांनी केले. यावेळी  होडावडेकर, रघुनाथ चव्हाण, राजू तांबे, ॲड. कदम आणि अंकुश चव्हाण यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. पावशी येथील कार्यक्रमानंतर कुडाळ येथील आंबेडकर नगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालाही संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.