
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांचा विचार करून दोडामार्ग ते धारगळ येथील आयुष हॉस्पिटल दरम्यान नियमित कदंबा बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी दोडामार्ग भाजपा शिष्टमंडळाने डिचोली मतदारसंघाचे आमदार यांच्याकडे केली. दोडामार्ग तालुक्यातील अनेक रुग्ण विविध आजारांच्या तपासणी व उपचारांसाठी धारगळ येथील आयुष हॉस्पिटलमध्ये नियमितपणे जात असतात. मात्र, दोडामार्ग ते धारगळ दरम्यान थेट आणि नियमित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे.
दोडामार्ग, मणेरी, सासोली, इब्रामपूर, हणखणे आदी भागांतील नागरिकांना या बससेवेचा मोठा लाभ होणार असून खासगी प्रवासी वाहनांची संख्या मर्यादित असल्यामुळे अनेकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कदंबा महामंडळाने तातडीने या मार्गावर बससेवा सुरू करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, कसई-दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आनंद तळणकर, प्रवीण गवस, समीर रेडकर, सुमित म्हाडगूत, कल्पेश गवस, पिकी कवठणकर, तनुज ताटे आदी उपस्थित होते.










