LIVE UPDATES

महिला सक्षमीकरणाला बळ देणारा उपक्रम

शिवणयंत्र वाटपातून स्वयंपूर्णतेची वाटचाल
Edited by: विनायक गांवस
Published on: June 13, 2026 14:45 PM
views 14  views

सिंधुदुर्ग : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवणयंत्र वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत १७ गरजू व होतकरू महिलांना मोफत शिवणयंत्रांचे वितरण करण्यात आले.

ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या कौशल्याला चालना देणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. शिवणयंत्रांच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या रोजगार निर्माण करण्याची आणि कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याची संधी मिळणार आहे.

माणगाव (कुडाळ) येथे झालेल्या या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष दयानंद कुबल, रिजनल मॅनेजर प्रथमेश सावंत, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर अमोल गुराम, सुरज कदम, साक्षी पोटे, प्रीती पांगे, हर्षला कोल्हे यांच्यासह संस्था पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना शिवणयंत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी महिलांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून स्वावलंबनाकडे वाटचाल करावी आणि कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन केले.

विशेष म्हणजे, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून सध्या कोकणातील विविध भागांमध्ये १९ ‘कोकण शिलाई स्कूल’ यशस्वीपणे कार्यरत आहेत. या प्रशिक्षण केंद्रांमधून अनेक महिलांनी शिवणकलेचे प्रशिक्षण घेऊन रोजगार व उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. आता शिवणयंत्र प्राप्त झालेल्या महिलांनाही या उपक्रमाशी जोडून त्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, रोजगाराच्या संधी तसेच भविष्यात स्वतःचे लघुउद्योग उभारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महिला सक्षमीकरणाच्या या चळवळीत अधिकाधिक महिला सहभागी झाल्यास त्यांना कौशल्यविकास, उत्पन्नवाढ, रोजगार निर्मिती, बाजारपेठेपर्यंत पोहोच आणि आत्मनिर्भर जीवनाची संधी मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

कोकण कला व शिक्षण विकास संस्था शिक्षण, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून समाजातील वंचित घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. शिवणयंत्र वितरणाचा हा उपक्रम संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन गौरी आडेलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैष्णवी म्हाडगुत, ऋचा पेडणेकर, हर्षदा कोरगावकर, तन्वी, अवंती गवस तसेच सर्व सहकारी, स्वयंसेवक व समर्थकांचे विशेष आभार मानण्यात आले.