
सावंतवाडी : येथील मच्छी मार्केटची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून अस्वच्छता आणि पाणीटंचाईमुळे विक्रेत्यांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न.प. कर्मचारी घसरून पडल्याने दुखातीन गंभीर झालेत. याप्रश्नी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला आहे. यावर तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल असा इशारा श्री. सुर्याजी यांनी दिला आहे
मच्छी मार्केट हे शहराच्या मध्यवर्ती आणि रहदारीच्या ठिकाणी आहे. बाजूलाच शाळा आणि रहिवासी वस्ती असल्याने येथील दुर्गंधीचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. मार्केटमधील अंतर्गत भागात असलेले बंदिस्त फ्रीज हटवून ती जागा मोकळी करावी तसेच विक्रेत्यांनी केवळ ठरवून दिलेल्या ओट्यांवरच बसावे, खाली बसण्यास बंदी घालावी. मार्केटमधील तुटलेल्या फरश्या, गटारे आणि खिडक्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करून नवीन बांधकाम करावे अशी मागणी केली.
फरशीवर सतत पाणी असल्याने सफाई कर्मचारी व नागरिक घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. हे टाळण्यासाठी तिथे 'मॅटिंग' घालून पाण्याचे योग्य नियोजन करावे. सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने मार्केटसाठी स्वतंत्र विहीर उपलब्ध करून द्यावी.होलसेल विक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावर पाणी सोडू नये. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित करून सांडपाणी थेट गटारात जाईल, अशी व्यवस्था करावी. मच्छी मार्केटचा फलक नवीन लावून तिथे रोषणाई करावी. तसेच दर्पण रेसिडेन्सीकडे जाणाऱ्या मार्गावर पथदिवे बसविण्यात यावेत. मार्केट परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामे तातडीने हटवण्यात यावीत अशी मागणी श्री सुर्याजी यांनी केली आहे. मुख्याधिकारी यांची भेट घेऊन देखील याकडे दुर्लक्ष केले जाते असल्याने नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होईल. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने कार्यवाही करून मच्छी मार्केटची सुव्यवस्था करावी. अन्यथा, आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.










