समाजमंदिर परिसरात पाणी टंचाई ; उपनगराध्यक्षांकडून तीव्र नाराजी

गॅस कंपनीकडून पाईप लाईनचे नुकसान
Edited by: विनायक गांवस
Published on: May 01, 2026 19:58 PM
views 40  views

सावंतवाडी : महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने भूमीगत गॅस लाईन घालताना समाजमंदिर परिसरात नळपाणी योजनेचे पाईप फोडल्याने समाजमंदिर, ज्युस्तीननगर भागात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ऐन उन्हाळ्यात लोकांना पाण्याची समस्या उद्भवू नये म्हणूनच आपण या कामांना स्थगिती दिली होती असेही त्यांनी सांगितले. 


उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर म्हणाले, गॅस कंपनीकडून भूमिगत लाईन टाकताना नळ पाणी योजनेची लाईन फुटल्याचे प्रकार घडले. त्याची दुरुस्ती कंपनीकडून केली. मात्र, आता खडीकरण करत असताना जमीनीखालील पाण्याची लाईन फुटल्याचे प्रकार घडत आहेत. गॅस कंपनीकडून हात वर केले जात असून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 'कामगार दिनी' कामगारांना सहन करावा लागलेला मनस्ताप बघून‌ त्यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच कृत्रिम पाणीटंचाई होऊ नये म्हणूनच प्रभारी नगराध्यक्ष असताना या कामाला मी स्थगिती दिली होती. मात्र, माझ्या सुचनांची अंमलबजावणी पुढे न झाल्याने आज ही परिस्थिती ओढवल्याचे मत उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी व्यक्त केले. 


दरम्यान, माजी नगरसेवक विलास जाधव म्हणाले, गॅस कंपनीला जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर खोदाई करण्यास परवानगी न मिळाल्याने भूमीगत लाईन टाकण्यात येत असताना नळपाणी योजनेची लाईन फुटल्याचे प्रकार घडलेत. यामुळे समाजमंदिर, ज्युस्तीननगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असून नागरिकांना प्यायला पाणी उपलब्ध नाही.‌ यामुळे आमच्याकडे रोष व्यक्त केला जात असून प्रशासनाचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत आहे. समाज मंदिर परिसरातील‌ पाण्याच्या टाकीचा पाईप गेले अनेक दिवस फुटला असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे लोकांना पाणी मिळत नसून यावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास पुन्हा एकदा टाकीवर चढाव लागेल, असा इशारा श्री. जाधव‌ यांनी दिला.