LIVE UPDATES

नवरात्रोत्सवात सिंधुदुर्गात लेझर लाईट, बीम्स वापरास मनाई

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 11, 2026 10:16 AM
views 32  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात नवरात्रौत्सव सण पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून सार्वजनिक मंडळांकडून  मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यात शक्यता असते. लेझर लाईट डोळ्यावर पडल्याने वृद्ध, लहान मुले व नागरिकांच्या आरोग्यास होणारा हा धोका आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्ह्यात लाईट/ उपकरणाच्या सार्वजनिक वापरास १० ऑक्टोंबर २०२६ रोजी ०१ वाजल्यापासून २५ ऑक्टोंबर २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत नवरात्रौत्सव कालावधीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लेझर लाईट/बीम्स उपकरण सार्वजनिकरीत्या वापरण्यास मनाई आदेश जारी केला आहे .

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ऑक्टोंबर २०२६ ते २० ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवरात्रौत्सव सण हा पारंपारिक पध्दतीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडाळाकडून मिरवणुकांचे आयोजन केले जाते. या मिरवणूकीमध्ये नवरात्र उत्सव मंडळाकडून लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात नवदुर्गा मुर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीवेळी मिरवणूक बघण्याकरीता आलेल्या भाविकांना लेझर लाईट डोळयावर पडल्याने व्यक्तींच्या डोळ्याच्या पडदा तसेच बुबळाला इजा/दुखापत झालेल्या घटना घडलेल्या आहेत. तसेच वृध्द व्यक्ती, लहान मुले, किशोरवयीन व्यक्तींच्या डोळयांना इजा/दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नवरात्रौत्सव कालावधीत मूर्ती आगमन, मूर्ती विसर्जन मिरवणूक तसेच इतर कार्यक्रमांदरम्यान लेझर लाईट डोळ्यांवर पडल्याने वृद्ध व्यक्ती, लहान मुले, किशोरवयीन व्यक्तींच्या डोळ्यांना इजा किंवा दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी त्वरित त्यास प्रतिबंध करणे गरजेचे आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश देत आहे की, दिनांक १० ऑक्टोंबर २०२६ रोजी ००:०१ वाजल्यापासून दिनांक २५ ऑक्टोंबर २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत नवरात्रौत्सव कालावधीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस लेझर लाईट/बीम्स उपकरण सार्वजनिकरीत्या वापरण्यास मनाई करण्यात येत आहे. 

वरील कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत काही अपरिहार्य कारणासाठी लेझर लाईट/बीम्स उपकरण याचा वापर करणेचा असलेस अशा वेळी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील.