
सावंतवाडी : ''आम्ही आमची संस्कृती जपली !'' असा व्हॉट्सॲप स्टेटस निरवडे माजी सरपंच तथा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांनी ठेवला आहे. निवडणूकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भुमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यात आता त्यांचा स्टेटस चर्चेत आला आहे.
गावडे हे तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक होते. मात्र, भाजपन तिथे संदीप गावडे यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घेतला. यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले होते. कट्टर राणे समर्थक अशी त्यांची ओळख असून या घटनेनंतर शिवसेना नेते, आमदार निलेश राणे यांनी श्री. गावडे यांची सदिच्छा भेट घेतली होती. यातच आज मतदानावेळी निरवडे-कोनापाल येथे श्री. गावडे व भाजपचे उमेदवार संदीप गावडे समोरासमोर आले. यावेळी त्यांनी राजकारणातपलिकडील मैत्रीच उदाहरण दाखवून दिलं. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर व अपक्ष उमेदवार अमेय पै देखील उपस्थित होते. या घटनेची चांगलीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच आता प्रमोद गावडे यांचा स्टेटस चर्चेत आला आहे. श्री. गावडे ९ फेब्रुवारी नंतर आपली भुमिका जाहिर करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे गावडेंच्या भुमिकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहिले आहे.










