
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला व मालवण नगरपरिषद तसेच कणकवली नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया रविवार, दि. 21 डिसेंबर रोजी अत्यंत शांत, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. सर्व मतमोजणी केंद्रांवर तसेच विशेषत: प्रत्येक टेबलवर सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि प्रशिक्षित कर्मचारी तैनात करण्यात आले होते. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे व प्रभावी सुरक्षाव्यवस्थेमुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे आणि कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यातील कोणत्याही मतमोजणी केंद्रावर फेर मतमोजणीची आवश्यकता भासली नाही. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या अंतर्गत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षिततेसाठी तसेच मतमोजणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी योग्य ती निगराणी व पर्यवेक्षण ठेवण्यात आले होते.
या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी स्वतः उपस्थित राहून बारकाईने लक्ष ठेवले. त्यांनी मतमोजणी केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, प्रवेश व निर्गमन नियंत्रण, तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतींची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री यावेळी करण्यात आली. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवर सुरक्षितता, पारदर्शकता आणि शिस्तबद्धता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते. मतमोजणी कक्ष, प्रवेशद्वार, स्ट्राँगरूम परिसर तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले होते. संपूर्ण प्रक्रियेवर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सातत्याने निगराणी ठेवण्यात येत होती. मतमोजणी केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच निवडणूक कर्मचारी, उमेदवारांचे प्रतिनिधी व माध्यम प्रतिनिधी यांच्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे व विविध यंत्रणांमधील समन्वयामुळे मतमोजणी प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पडली.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक समन्वय अधिकारी (नोडल) विनायक औंधकर, वेंगुर्ला निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी, सहायक निवडणूक अधिकारी हेमंत किरुळकर, कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी दिक्षांत देशपांडे, सहायक निवडणूक अधिकारी गौरी पाटील,मालवण निवडणूक निर्णय अधिकारी सुर्यकांत पाटील, सहायक निवडणूक अधिकारी प्रतीक थोरात, सावंतवाडी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर पाटील तर सहायक निवडणूक अधिकारी संतोष जिरगे यांनी सार्वत्रिक निवडणुकीची ही प्रक्रीया यशस्वीपणे पार पाडली.










