
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी आज तहसील कार्यालय येथे पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, मतमोजणी प्रकिया शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी तहसील कार्यालया परिसरातील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली असून आज सकाळी १०.०० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या काळात परिसरात होणारी गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेता तहसील कार्यालय ते टोपीवाला स्मारक तंत्रनिकेतन विद्यालय पर्यंतचा रस्ता. तहसील कार्यालय ते बी.एस. बांदेकर कॉलेजकडून बांदा नाक्यापर्यंत जाणारा रस्ता. तहसील कार्यालय ते शिरोडा रस्ता (ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र इमारत पर्यंत). तहसील कार्यालय ते मिलाग्रीस हायस्कूल पर्यंतचा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. मतमोजणीच्या दिवशी या भागातील नागरिकांनी व वाहनधारकांनी वरील मार्गांऐवजी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा तसेच आपल्या वाहनांच्या पार्किंगची व प्रवासाची व्यवस्था आगाऊ नियोजित करावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.










