
कुडाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान होत असताना, माड्याचीवाडी येथील एका नवदाम्पत्याने विवाह सोहळा आटोपताच थेट मतदान केंद्र गाठून आपला मतदानाचा हक्क बजावला.
विवाहबेडीत अडकले, पण कर्तव्याला विसरले नाहीत
माड्याचीवाडी येथील प्रदीप गोपाळ खराडे आणि त्यांची पत्नी शांती खराडे यांचा आज विवाह संपन्न झाला. लग्नाचा मुहूर्त असल्याने सर्वत्र लगबग होती, मात्र या आनंदाच्या क्षणीही आपण देशाचे नागरिक म्हणून आपले कर्तव्य विसरता कामा नये, या भावनेतून या दापत्याने तेंडोली मतदारसंघातील मडगांव बुथ क्र. ३०/४ वर जाऊन मतदान केले.
आज लग्नाचे मुहूर्त असल्याने कुडाळ तालुक्यात ठिकठिकाणी विवाह सोहळे पार पडत आहेत. मात्र, अनेक वऱ्हाडी आणि नवरदेव-नवरींनी लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर लगेच मतदान केंद्रावर हजेरी लावली. अक्षता अंगावर असतानाच मतदान केंद्रावर पोहोचलेल्या या जोडप्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि सक्षम प्रशासनासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, हेच या कृतीतून अधोरेखित झाले.










