ग्रा.पं. न्हावेलीचा गांडूळ खत प्रकल्प पडला धूळखात

Edited by: विनायक गांवस
Published on: December 12, 2025 16:18 PM
views 29  views

सावंतवाडी : ग्रामपंचायत न्हावेलीचा गांडूळ खत व कचरा व्यवस्थापन प्रकल्प अक्षरश : धुळखात पडला असून प्रकल्पातील लोखंडी शेडवरील पत्रेही चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे. परिसरात वाढलेली झाडी, मोडकळीस आलेल्या संरचना आणि पूर्णपणे सोडून दिलेला प्रकल्प पाहून ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

प्रकल्पाच्या अगदी शेजारी ग्रामपंचायतकडून स्मशानभूमीची जागा मंजूर करण्यात आली आहे. मात्र त्या जागेकडे जाण्यासाठी कोणतीही पायवाट नसल्याने स्मशानभूमी प्रत्यक्षात सुरू होईल की नाही, याबाबत ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली आहे. मृतदेहांनाही पायवाट नसलेल्या दाट झाडीतून नेणार का,असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, गावाच्या विकासासाठी मंजूर झालेले प्रकल्प निष्काळजीपणामुळे व गैरव्यवस्थापनामुळे वाया जात आहेत. ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित प्रकल्पांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या या नाराजीला ग्रामपंचायतीने कोणते उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.