
सेल्फी पॉइंट आणि महिला कर्मचाऱ्यांची पूर्ण तयारी
सिंधुदुर्गनगरी : लोकशाहीच्या या महत्त्वाच्या उत्सवात आज जिल्ह्यातील ‘सखी मतदान केंद्रां’ना विशेष आकर्षण लाभलं. गुलाबी रंगाच्या सजावटीत नटलेले केंद्र, प्रवेशद्वारावर फुलांची रांगोळी, स्वागतासाठी उभ्या असलेल्या महिला कर्मचारी- संपूर्ण वातावरणात स्फूर्ती आणि आत्मविश्वास दाटून वाहत होता.
सकाळी मतदानाला सुरुवात होताच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. नवमतदार मुलींपासून ते ज्येष्ठ मातोश्रींपर्यंत सर्वांनी अभिमानाने मतदानाचा हक्क बजावला. केंद्रावर उभारण्यात आलेल्या ‘सेल्फी पॉइंट’ने युवतींचे विशेष आकर्षण ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 ठिकाणी सखी मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली होती.
सखी केंद्रातील सर्व कामकाज- मतदान प्रक्रिया, पडताळणी, तांत्रिक सहाय्य- पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडूनच पार पाडले जात असून, हीच संकल्पना महिला सक्षमीकरणाचे सुंदर चित्र उभं करते, असे नागरिकांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाने महिला मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी वातावरण देण्यासाठी केलेली ही विशेष संकल्पना यशस्वी ठरत असून, मतदानाचा टक्का वाढविण्यातही या केंद्रांचा मोठा वाटा राहणार आहे.










