
वेंगुर्ला : गेला एक महिनाभर वेंगुर्ला तालुक्यातील तुळस तलाठी रजेवर असल्यामुळे शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. तुळस गावचा अतिरिक्त भार पेंडूर गावचे तलाठी यांच्याकडे देण्यात आला आहे मात्र, त्यांच्याकडेही इतर ५ गावचा अतिरिक्त भार असून तेही योग्य वेळ गावाला देऊ शकत नसल्याने गावातील बऱ्याच शेतकऱ्यांचे सातबारा, आठ अ व इतर कामात अडचणी निर्माण आले आहे. त्यामुळे याकडे वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतरी यांनी तात्काळ लक्ष देऊन तात्काळ कायमस्वरूपी तलाठी तुळस गावाला द्यावा अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय यांनी केली आहे.
दिवसात १५ जून पासून शाळा व कॉलेज सुरू होत असल्यामुळे बऱ्याच जणांना उत्पन्नाचे दाखले हे सुद्धा योग्य वेळेत मिळत नाहीत. तुळस गावची लोकसंख्या ४ हजार ४०९ असून या गावासाठी तलाठी कायम उपलब्ध पाहिजे. तलाठ्यांच्या गैरसूईमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी सातबारावर बोजा ठेवून कर्जाची उचल दिली जाते त्यामुळे कर्जाची शेतीला घेणाऱ्या कर्ज पुरवठाही स्थगित झालेला आहे. याबाबत योग्य ती दखल घेऊन तुळस गावासाठी तात्काळ कायमस्वरूपी तलाठी द्यावा अशी मागणी श्यामसुंदर राय यांनी केली आहे.










