
वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिलेल्या मुदती पैकी आज पाचव्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. प्रभाग ६ अ मधून काँग्रेस तर्फे अमिता गावडे यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान सर्वच उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्याचे बाकी असल्याने उद्या शनिवार आणि सोमवार या शेवटच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची गर्दी निवडणूक कक्षात होणार आहे.
वेंगुर्ले नगर परिषदेच्या नगराध्यक्ष १ आणि नगरसेवक २० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अर्ज भरण्यासाठी आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. त्यापैकी उद्या शनिवारी उमेदवारी अर्ज भरता येणार. मात्र रविवारी सुट्टी असल्याने तो दिवस बाद होणार असून सोमवार १७ नोव्हेंबर हा दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असणार आहे. त्यामुळे उर्वरित दोन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. वेंगुर्ले शहरातून सुमारे शंभर उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.












