
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय संमेलन आयोजन समितिच्या श्रीराम वाचन मंदिरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर व श्रीराम वाचन मंदिर चे कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. २८ डिसेंबरला राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री नीरजा असून उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. सुनीलकुमार लवटे उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय साहित्य संमेलन घेण्यात येत आहेत. या संमेलनासाठी सिंधुदुर्गातून श्रीराम वाचन मंदिरला पाच लाखाचा निधी देण्यात आला आहे. त्यातून एकदिवशीय संमेलन होत आहे.
संमेलनानिमित्त जिल्हास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धा १४ डिसेंबरला, तर शिक्षकांसाठी पुस्तक रसग्रहण स्पर्धा ७ डिसेंबर रोजी आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. तसेच आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धो आयोजित करण्यात येणार आहे. यातील विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक भेट दिले जाणार आहे. याशिवाय संमेलन लोगो स्पर्धेचेही आयोजन केले जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती लवकरच प्रसारित केली जाणार आहे.
संमेलनात मुख्य मुलाखत घेण्याच्या दृष्टीने डॉ. भालचंद्र मुणगेकर, संध्या नरे-पवार यांच्या नावाची चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे, विठ्ठल कदम यांच्यासह मधुकर मातोंडकर, राजेश मोंडकर, श्वेतल परब, मंजिरी मुंडले, विजय ठाकर, मनोहर परब, काका पटेल, महेंद्र सावंत आदी उपस्थित होते.










