LIVE UPDATES

रेल्वेच्या धडकेत नाधवडेतील तरूणाचा मृत्यू

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 24, 2026 19:32 PM
views 1054  views

वैभववाडी : रेल्वेच्या धडकेत नाधवडे हेलकरवाडी येथील अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास शुकनदी पुलाजवळ घडली.

अमोल खांडेकर यांचे मूळ गाव नाधवडे असून वैभववाडी रेल्वे स्थानकापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या हेलकरवाडीत त्यांचे घर आहे. ते मुंबईतील चिंचपाडा परिसरात आई, पत्नी आणि मुलीसह वास्तव्यास होते. आज सकाळी ते कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईहून वैभववाडीत आले. रेल्वे स्थानकावर उतरून ते पायीच घराच्या दिशेने निघाले होते.

दरम्यान, शुकनदी पुलानजीक पोहोचताच गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या निस्सार एक्सप्रेसची त्यांना जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित एक्सप्रेस सुमारे तासभर घटनास्थळी थांबविण्यात आली होती. त्यामुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.

या घटनेची माहिती रेल्वे पोलिस दलाचे अधिकारी प्रवीण मोरे यांनी वैभववाडी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज सोनलवकर, पोलीस हवालदार धनाजी धडे व उद्धव साबळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविला.

खांडेकर हे आपल्या मालकीच्या जमिनीत काजू लागवडीपूर्वीची तयारी करण्यासाठी गावी आले होते. यासाठी त्यांनी आज सकाळी खड्डे खोदण्याकरिता जेसीबी मशीन बोलावले होते. अपघात घडला त्यावेळी ते जेसीबी चालकासोबत मोबाईलवर बोलत होते. अचानक संभाषण तुटल्याने चालकाने पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने संशय निर्माण झाला. नंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तीकडून अपघाताची माहिती मिळाली.

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक मुंबईहून गावी रवाना झाले आहेत. अमोल खांडेकर हे नामांकित कंपनीत नोकरीला होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.