
सावंतवाडी : शहरातील समस्या बघाया नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले यांनी अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांचे कंत्राटदार यांच्या उपस्थितीत बैठक घेत सुचना दिल्या. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत शहरातील रस्ते, गटारे, नाले आरोग्य विषयक बाबींबाबत पावसाळा पूर्व नियोजनाच्यादृष्टीने नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये संबंधित प्रभागाचे नगरसेवक यांनी प्रभागनिहाय मांडलेल्या समस्या जाणून घेवून शहरात गॅस पाईपलाईन तसेच पाणी पुरवठा योजनेसाठी खोदण्यात आलेले चर बुजविणे तसेच रिस्टोरेशनच्या कामासाठी नेमण्यात आलेले कंत्राटदार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. ही कामे येत्या पाच दिवसात पूर्ण करून देण्यात येतील अशी ग्वाही संबंधीत ठेकेदार यांनी दिली. तसेच शहरातील ट्रॅफीक समस्या, विविध ठिकाणी झालेली अतिक्रमणे याबाबत चर्चा करण्यात आली.
मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेने नेमलेल्या पथका मार्फत सर्व्हे करून संबंधीतांना नोटीस बजावणी करून सात दिवसात अहवाल सादर करण्यात येईल अशी ग्वाही दिली. तसेच एमएनजीएलच्या कामातील निष्काळजीपणाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात येईल असे सांगितले. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटदार यांनी कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत अशा सुचना नगराध्यक्षांनी दिल्या. तसेच पावसाळा सुरू झालेला असल्याने शहरातील धोकादायक झाडे, स्ट्रीट लाईट समस्या, गटारात साचलेले पाणी, डास प्रतिबंधक फवारणी, मोकाट कुत्रे व इतर जनावरे यांचा बंदोबस्त करण्याची वगैरे कामे प्राधान्याने पार पाडावीत अशा सुचना अधिकारी कर्मचारी यांना नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्याकडून देण्यात आल्या. यावेळी मुख्यधिकारी विनायक औंधकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, उद्यान आणि पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, सुकन्या टोपले, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, तौकीर शेख, देवेंद्र टेमकर तसेच नगरसेवक सर्व अधिकारी उपस्थित होते.










