LIVE UPDATES

इन्सुली घाटात अपघात

कार दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली
Edited by: विनायक गांवस
Published on: June 09, 2026 19:35 PM
views 38  views

सावंतवाडी : इन्सुली घाटात ट्रक आणि टाटा नेक्सॉन कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कार दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारमधील एका तरुणाला किरकोळ दुखापत झाली आहे.

टाटा नेक्सॉन कार (एमएच १९ ईजी ७३६०) बांद्याहून सावंतवाडीच्या दिशेने जात होती. तर अशोक लेलँड ट्रक (एमएच १२ डब्ल्यूजे ९१९४) सावंतवाडीहून बांद्याच्या दिशेने येत होता. आज दुपारच्या सुमारास इन्सुली घाटातील वळणावर हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घाटातील वळणावर ट्रक विरुद्ध लेनमध्ये आल्याने त्याच्या मागील चाकाची टाटा नेक्सॉन कारला जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की कार रस्त्याच्या कडेला जाऊन दरीच्या दिशेने कलंडली. मात्र, सुदैवाने कार दरीत कोसळली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. या अपघातात कारमधील राकेश सकपाळ (वय ३१, रा. बांदा) यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कारमधील अन्य दोघे प्रवासी सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.