
सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीमधील मुख्य पाण्याचा पंप गेल्या दोन दिवसांपूर्वी बिघडल्याने संपूर्ण रुग्णालयाचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला असून रुग्णालयाचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे.
रुग्णालयात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याचे समजताच उपजिल्हा रुग्णालय प्रभारी परिचारिका सुप्रिया नाईक, रुग्ण कल्याण समितीचे आमदार प्रतिनिधी तथा नगरसेवक देव्या सूर्याजी, आणि जीवनरक्षा संस्थेचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री. सूर्याजी यांनी थेट आमदार दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली. रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी आमदार श्री. केसरकर यांनी कोणतीही वाट न पाहता तातडीने स्व खर्चाने नवीन मोटर पंप उपलब्ध करून दिला. नवा पंप आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे अखेर रात्रीच रुग्णालयाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. या दरम्यान मोटर टेक्निशियन उबेद शेख यांचे योगदान कौतुकास्पद ठरले. त्यांची पत्नी प्रसूतीसाठी याच रुग्णालयात दाखल झालेली असतानाही त्यांनी रुग्णालयातील शेकडो रुग्णांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी दिवस-रात्र स्वतः राबून मेहनत घेत पंप कार्यान्वित केला. संकटसमयी तत्परता दाखवून रुग्णालयाला आणि रुग्णांना मोठा दिलासा दिल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी आमदार दीपक केसरकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, माजी नगरसेवक राजू मसूरकर, परिचारिका सुप्रिया नाईक आणि तंत्रज्ञ उबेद शेख यांचे रुग्णालयाच्या वतीने विशेष आभार मानले आहेत.










