LIVE UPDATES

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे कंटेनरचा भीषण अपघात

दुचाकीला धडक दिल्याने दोन महिला जखमी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 08, 2026 19:17 PM
views 927  views

कुडाळ : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ येथे आज संध्याकाळी भीषण अपघाताची घटना घडली. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या असून दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, दोन्ही महिला या भीषण अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास गोव्याकडे जाणारा कंटेनर (क्र. MH 04 NB 9995) महामार्गावरील बजाज शोरूम जवळ आला असता, पावसाने निसरड्या झालेल्या रस्त्यावर चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर घसरला. याच वेळी समोरून जाणाऱ्या दुचाकीला (क्र. MH 07 AK 7017) या कंटेनरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कंटेनरची चालक केबिन विरुद्ध दिशेला वळून थेट दुभाजकावर जाऊन आदळली.

या अपघातात दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या असून त्यांना तातडीने कुडाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 'दैव बलवत्तर' म्हणून या महिलांचे प्राण वाचले असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असून, या घटनेचा अधिक तपास कुडाळ पोलीस करत आहेत.