
सावंतवाडी : मळगाव रेल्वे फाटकापासून काही अंतरावर रेल्वे ट्रॅक ओलांडताना मांडवी एक्सप्रेसची धडक लागून निरवडे येथील एका ६२ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. ललिता मिलिंद झाटे (रा. निरवडे - भंडारवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललिता झाटे या सकाळी घरचे साहित्य घेण्यासाठी मळगाव बाजारपेठेत आल्या होत्या. बाजार करून परत जात असताना मळगाव रेल्वे फाटकापासून साधारण २०० मीटर अंतरावर त्या रेल्वे ट्रॅक ओलांडत होत्या. त्याचवेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसची त्यांना जोरदार धडक बसली. या धडकेमुळे त्या रेल्वे ट्रॅकवर फेकल्या गेल्या आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सावंतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेमुळे निरवडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.










