
देवगड : पंचायत समिती देवगड यांच्या वतीने आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात व स्नेहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गेली ३७ वर्षे आरोग्य सेवेची जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडल्यानंतर त्या निवृत्त होत असल्याने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिगंबर खराडे, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, शाखा अभियंता अनिल तांबे, सहाय्यक लेखाधिकारी चिंदरकर, अधिक्षक कुणाल मांजरेकर, अधिक्षक मेधा राणे, प्रकाश वळंजु, प्रथमेश वळंजु आदी मान्यवर तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच आरोग्य विभागातील सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा वळंजु यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना वक्त्यांनी आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु यांच्या कार्यतत्परतेचे, शिस्तबद्ध कामकाजाचे आणि लोकांशी असणाऱ्या आत्मीयतेच्या नात्याचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागात आरोग्याच्या योजना पोहोचवण्यामध्ये त्यांच्या योगदानाची नोंद घेत, त्यांच्या आगामी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सहकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व कार्यकाळातील अनुभव शेअर केले. प्रतिमा वळंजु यांनी २०/२/१९८९ आरोग्य सेविका पदावर पाटगांव उपकेंद्रात नोकरीत रुजु त्यानंतर १९९८ मध्ये प्रमोशन आरोग्य सहाय्यीका पदावर इळये प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनतर २००१ ला बदली फणसगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच २००८ ला कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात, २०१५ ला पं.स देवगड प्रमोशन विस्तार अधिकारी आरोग्य पदावर ११ वर्षे यशस्वीपणे काम पाहिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कक्ष अधिकारी संतोष बिर्जे सुत्रसंचलन सिमा बोडेकर व आभार कृषी अधिकारी दिगंबर खराडे यांनी मानले.











