आरोग्य विभागाचा आंधळा कारभार : देवानंद पालांडे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 06, 2026 18:34 PM
views 181  views

वैभववाडी : तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असले, तरी आरोग्य विभागाचा कारभार आंधळा बनल्याची तीव्र नाराजी पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे यांनी व्यक्त केली. पंचायत समिती सभागृहात सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आरोग्य विभागातील रिक्त पदांचा मुद्दा ऐरणीवर आला.

 पालांडे यांनी सांगितले की, तालुक्यात आरोग्य सेविका पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर उपकेंद्रातील आरोग्य सेविकांना ड्युटी लावली जात असून त्यामुळे संबंधित उपकेंद्रातील सेवा विस्कळीत होत आहे. परिणामी ग्रामीण भागातील रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

तसेच अनेक उपकेंद्रांमध्ये सफाई कामगार नसल्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. “अशा पद्धतीने कारभार सुरू राहिल्यास तालुक्याचे आरोग्य कसे सुधारणार?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.यावेळी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानासाठी निकषांची स्पष्ट यादी तयार करून ती प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावी, तसेच या अभियानात त्यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, अशी सूचना पालांडे यांनी मांडली.