
देवगड : देवगड तालुक्यातील वाडातर येथील एका घरफोडी प्रकरणात चोरीस गेलेले सुमारे ५ लाख रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात देवगड पोलिसांना यश मिळाले आहे.यामध्ये एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
या विषयी पोलिसांकडून मिळालेल्या माहिती च्या आधारे वाडातर येथील रहिवासी प्रतिभा प्रदीप चोपडेकर (वय ६८) यांनी ४ जून रोजी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १ जून रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या कालावधीत त्या वाडातर खाडी परिसरात कालवे व मुळे काढण्यासाठी गेल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे पाच तोळे वजनाचे, अंदाजे ५ लाख रुपये किमतीचे तीन पदरी सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते.याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ आशिष कदम यांनी तांत्रिक तपास केला.या तपासादरम्यान वाडातर येथील सिताराम धनाजी भाबल (वय ३०) याच्यावर संशय बळावला. त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.आरोपीकडून पुढील तपासात चोरीस गेलेले सुमारे ५ लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, तसेच पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोहेकॉ आशिष कदम, गणपती गावडे, संतोष नाटेकर, प्रतिक जाधव, रविंद्र महाले आणि नितीन डोईफोडे यांचा सहभाग होता. पोलिस हेड कॉन्स्टेबल आशिष कदम यांच्या कडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.










