
सिंधुदुर्गनगरी : पर्यावरण संवर्धन, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीन) आणि विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, सिंधुदुर्गच्या माध्यमातून १५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत “प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच जिल्हावासीयांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख स्वच्छ, सुंदर आणि पर्यटन जिल्हा म्हणून आहे. वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे रस्त्यावर प्लास्टिक बाटल्या, रॅपर यांसारखा कचरा दिसून येतो. या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी व जिल्हा स्वच्छ ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या कालावधीत प्रत्येक शाळेच्या माध्यमातून गावातील प्लास्टिक बाटल्या आणि ई-वेस्ट संकलित करण्यात येतील. तालुकास्तरावर सर्वाधिक प्लास्टिक गोळा करणाऱ्या उत्कृष्ट शाळेला तसेच शाळास्तरावर सर्वाधिक प्लास्टिक संकलन करणाऱ्या विद्यार्थ्याला जिल्हा परिषदेच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेदरम्यान जमा होणारे प्लास्टिक ‘शिवप्रतिज्ञा बहुद्देशीय सेवाभावी संस्था, मिरज (जि. सांगली)’ यांच्या माध्यमातून पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येईल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होऊन ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’ घडविण्यास हातभार लागेल.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर यांनी सांगितले की, “जिल्हावासियांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्यास सिंधुदुर्ग जिल्हा पहिला पर्यटन जिल्हा, पहिला स्वच्छ जिल्हा आणि पहिला प्लास्टिकमुक्त जिल्हा म्हणून नव्या ओळखीने उजळून निघेल.”











